पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे नशामुक्त रॅली - महिलांचा मोठा सहभाग, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
पी.एल. लोखंडे मार्ग चेंबूर येथे ऐतिहासिक नशामुक्त अभियान रॅली - सर्वपक्षीय एकजुटीचे दर्शन
चेंबूर, मुंबई (प्रतिनिधी) - आज पी.एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथे सर्व पक्ष, विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक महिला मंडळ, युवक आणि युवतींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य "नशामुक्त अभियान रॅली" मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीने संपूर्ण चेंबूर परिसर दणाणून सोडला आहे.
"नशा मुक्ती झालीच पाहिजे, नशा हद्दपार झालीच पाहिजे"
रॅली दरम्यान आंदोलकांनी "नशा मुक्ती झालीच पाहिजे, नशा हद्दपार झालीच पाहिजे, चेंबूर वाचवा, युवा पिढी वाचवा, अमली पदार्थ बंद झालेच पाहिजेत" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. हातात फलक, बॅनर घेऊन महिला, युवकांनी या व्यसनाच्या विळख्याविरोधात संताप व्यक्त केला.
iगेल्या काही महिन्यांपासून पी.एल. लोखंडे मार्ग, टिळक नगर, चेंबूर कॉलनी परिसरात अमली पदार्थांची विक्री, गांजा, चरस, एमडी सारख्या घातक पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शाळा, कॉलेज परिसरात तरुण पिढी बरबाद होत असल्याचे चित्र स्थानिकांनी मांडले.
पोलिस प्रशासनाचे आश्वासन
loया रॅलीची दखल घेत टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढेमरे साहेब यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, "पी.एल. लोखंडे मार्ग परिसरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. कोणालाही सोडले जाणार नाही. आम्ही विशेष पथक तयार करून छापे टाकणार आहोत."
ढेमरे साहेबांच्या या आश्वासनानंतर आंदोलकांनी समाधान व्यक्त केले, मात्र त्यांनी इशाराही दिला आहे.
DCP ऑफिसवर आंदोलनाचा इशारा
सर्व आंदोलकांच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देण्यात आले असून त्यात स्पष्ट म्हटले आहे की, "जर येत्या 8 दिवसात पी.एल. लोखंडे मार्ग परिसरातील नशा विक्रीवर ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही सर्व पक्ष, संघटना मिळून थेट DCP ऑफिस, झोन 6 येथे तीव्र आंदोलन छेडू. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल."
या रॅलीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय तसेच अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आले होते. पक्षभेद विसरून चेंबूरच्या तरुणाईसाठी सर्वांनी एकजूट दाखवली, हे या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले.
स्थानिक महिलांनी सांगितले - "आमची मुले संध्याकाळी बाहेर जायला घाबरतात. नशा करणारे टोळके बसले असतात. आम्हाला आमचा परिसर सुरक्षित हवा आहे."
लोक शोधक न्यूज या अभियानाला पूर्ण पाठिंबा देत असून या परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून राहील.
नशामुक्त चेंबूर, सुरक्षित चेंबूर - लोक शोधक न्यूजचा निर्धार

Comments
Post a Comment